E-Sanjeevani: दवाखान्यात जाण्याची गरजच नाही! डिजिटल आरोग्य सेवेत नाशिकचा दबदबा, हजारो नागरिकांचा उपचारांना प्रतिसाद

ई संजीवनी या मोफत डिजिटल आरोग्य सेवेच्या वापरात नाशिक जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला, वेळ आणि खर्चाची बचत यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

E-Sanjeevani: दवाखान्यात जाण्याची गरजच नाही! डिजिटल आरोग्य सेवेत नाशिकचा दबदबा, हजारो नागरिकांचा उपचारांना प्रतिसाद

E-Sanjeevani:डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने ‘ई-संजीवनी’ ही सेवा मोठा बदल घडवत आहे. दवाखान्यात जाण्याची कटकट, रांगा, प्रवासाचा खर्च आणि वेळेचा अपव्यय यावर प्रभावी उपाय ठरणारी ही टेलीमेडिसिन सेवा सध्या नाशिक जिल्ह्यात विशेष यशस्वी ठरत आहे. डिसेंबर महिन्यात ई-संजीवनी सेवेद्वारे डॉक्टरांशी सल्लामसलत करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत नाशिक जिल्हा देशात अव्वल ठरला आहे.

ई-संजीवनी ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि सी-डॅकच्या तांत्रिक सहकार्याने राबवली जाणारी मोफत डिजिटल आरोग्य सेवा आहे. या सेवेमुळे नागरिकांना घरबसल्या डॉक्टरांशी थेट संवाद साधण्याची सुविधा मिळते. व्हिडिओ कॉल किंवा ऑडिओ माध्यमातून सल्ला, औषधांबाबत मार्गदर्शन तसेच पुढील उपचारांचा पाठपुरावा या सेवेतून केला जातो.

नाशिक जिल्ह्यात ई-संजीवनी ओपीडी सेवा प्रभावीपणे राबवली जात असून, केवळ एका महिन्यात तब्बल १,८१८ नागरिकांनी या सेवेद्वारे वैद्यकीय सल्ला घेतल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सेवा विशेष लाभदायक ठरत आहे. डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यातील अडचणी, अंतर आणि आर्थिक मर्यादा यावर ई-संजीवनीने मोठ्या प्रमाणात मात केली आहे.

या यशामागे आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. गावोगावी जाऊन आशा सेविका नागरिकांना ई-संजीवनीबाबत माहिती देत आहेत. नोंदणी प्रक्रिया, टोकन कसे घ्यायचे, डॉक्टरांशी संवाद कसा साधायचा याबाबत त्या मार्गदर्शन करत असल्यामुळे नागरिकांचा डिजिटल आरोग्य सेवांवरील विश्वास वाढत आहे. अनेक नागरिक पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला घेत असून त्याचा सकारात्मक अनुभव घेत आहेत.

ई-संजीवनी सेवेमध्ये आभा आयडीचा वापर केला जातो. त्यामुळे रुग्णांची आरोग्य माहिती सुरक्षित पद्धतीने संग्रहित राहते आणि पुढील उपचारांसाठी ती उपयोगी ठरते. सल्लामसलतीदरम्यान मिळणाऱ्या प्रिस्क्रिप्शन आणि वैद्यकीय सूचनाही नागरिक थेट डाउनलोड करू शकतात. ही सेवा डिजिटल इंडिया आणि आयुष्मान भारत या राष्ट्रीय उपक्रमांचा महत्त्वाचा भाग मानली जाते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अधिकाधिक नागरिकांनी ई-संजीवनी ओपीडी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. घरबसल्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिक esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपद्वारे सहज नोंदणी करून या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

एकूणच, नाशिक जिल्ह्यात ई-संजीवनीचा वाढता वापर हा डिजिटल आरोग्य सेवांच्या यशस्वी अंमलबजावणीचा उत्तम नमुना ठरत असून, भविष्यात ही सेवा आणखी व्यापक स्वरूपात नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number