Nashik Water Cut : राज्यात मान्सूनचे लांबलेले आगमन आणि धरणांमधील घटती पाणीपातळी लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने शहरात अधिकृतपणे पाणीकपात लागू केली आहे. येत्या शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी महापालिकेला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, भविष्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
जून-जुलै महिन्यांचे नियोजन आणि पाणी वितरणाची सद्यस्थिती
दरम्यान, नाशिक शहराची तहान भागवण्यासाठी दररोज सरासरी 600 दशलक्ष लीटर (MLD) इतके कच्चे पाणी गंगापूर धरण समूह आणि मुकणे धरणातून उपसले जाते. हे पाणी शहरातील 7 वेगवेगळ्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये शुद्ध केले जाते. त्यानंतर 134 जलकुंभ आणि तब्बल 2502 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांच्या विस्तीर्ण जाळ्याद्वारे संपूर्ण शहरात वितरित केले जाते. सध्याच्या नियोजनानुसार, जून महिन्यातील 2 शनिवार आणि जुलै महिन्यातील 4 शनिवार अशा प्रकारे या दोन्ही महिन्यांत दर शनिवारी शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत 18 दिवसांची पाणीकपात
महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शहरासाठी एकूण 6400 दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण असून, त्यापैकी 5133.99 दशलक्ष घनफूट पाण्याचा प्रत्यक्ष वापर झाला आहे. सद्यस्थितीला धरणांमध्ये केवळ 1266.01 दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. शहराला दररोज सरासरी 21.13 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता भासते, ज्यानुसार हा शिल्लक साठा पुढील 60 दिवस पुरू शकतो. मात्र, ऑगस्ट अखेरपर्यंतचा काळ विचारात घेता एकूण 78 दिवसांची गरज आहे. म्हणजेच, आगामी काळात सुमारे 18 दिवसांची पाण्याची तूट निर्माण होणार असल्यामुळे प्रशासनाला ऑगस्ट महिन्यात अधिक कडक पावले उचलावी लागणार आहेत.
ऑगस्टमध्ये 11 दिवस शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद
तथापि, जून आणि जुलै महिन्यातील साप्ताहिक कपातीनंतरही पाण्याची टंचाई भरून काढण्यासाठी ऑगस्ट 2026 मध्ये दोन दिवसाआड पाणी कपात करण्याचा निर्णय अनिवार्य करण्यात आला आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात एकूण 11 दिवस पाणी पुरवठा केला जाणार नाही. नाशिककरांनी पाणी जपून वापरावे आणि 1, 4, 7, 10, 13, 16, 19, 22, 25, 28 आणि 31 ऑगस्ट 2026 या तारखांना पाणी पुरवठा होणार नसल्याची नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.