जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशकातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात जात पंचायतीच्या जाचाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा गुन्हा दाखल करु नये, म्हणून जात पंचायातीने कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी कुटुंबाला वाळीत टाकलं गेलंय. पीडित तरुणीबरोबर लग्न करण्याबाबत दिलेलं लेखी आश्वासन पाळण्यास नकार दिल्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.
राजेवाडी गावातील दिनकर शिवा येले या 19 वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर गुन्ह्या विषयी कुठेही बोलू नये, म्हणून तरुणीच्या कुटुंबीयांना धमकवण्यात आलं. विशेष म्हणजे आरोपीने बलात्काराचा गुन्हा केल्याचं बाँड पेपरवर कबूल करत आपल्या कृत्याचा एक प्रकारे सौदाच केला. अल्पवयीन तरुणी ज्यावेळी सज्ञान होईल, त्यावेळी तिच्याशी विवाह करण्याचं त्याने लेखी दिलं. विवाह न केल्यास तिच्या नावावर पाच एकर जमीन देण्याचं हमीपत्रही त्याने नोटरी करुन पंचांसमक्ष लिहून दिलं.
परंतू या घटनेला दीड महिना झाला आणि आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेला दिलेलं आश्वासन ही तोडलं. जो लेखी पेपर दिलेला, तो पेपरच फाडून टाकण्याची जबरदस्ती केली. मुलीच्या वडिलांनी पेपर फाडण्यास नकार दिला, तेव्हा जात पंचायतीने वाळीत टाकलं, असं पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितल. पीडित मुलीचं कुटुंबीय ठाकूर समाजाचं आहे. त्यांना गावातील लग्नकार्यातही येऊ दिलं जात नाही. त्यांच्याशी कोणी संबंधही ठेवत नसल्याचं वास्तव उघडकीस आलं.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जात पंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.