महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात वारंवार भूकंपाचे हादरे बसत असल्याने प्रशासनानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यात आज दुपारी 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. धुंदलवाडी, आंबोली, कासा आणि आसपासच्या भागात जमिनीला हादरे जाणवल्याने नागरिक काही काळ घराबाहेर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
नाशिक जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा धक्का जाणवला. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात दुपारी सुमारे 3.27 वाजता जमिनीला हादरे बसले. यापूर्वीही मागील 24 तासांत एकदा भूकंपाची नोंद झाली होती. सुरगाणा, पेठ, दिंडोरी आणि कळवण या भागांतील नागरिकांनीही सौम्य धक्के जाणवल्याचे सांगितले आहे.विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात या परिसरात अनेक वेळा भूकंपाचे हादरे जाणवल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. वारंवार होणाऱ्या या भूकंपीय हालचालींचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांकडून अभ्यास सुरू आहे. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिरिक्त खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात विशेष भूकंप मापन केंद्र उभारण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, संभाव्य हालचालींवर अधिक अचूकपणे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.