जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
पालकांनो, तुम्ही तुमच्या चिमुकल्यांवर लक्ष ठेवा. तुमचा चिमुरडा घरी खेळत असताना तो घरातल्या कोणत्या वस्तू, कोणतं खाद्यपदार्थ उचलून खातायेत. यावर लक्ष ठेवा. नाशिकमधल्या एका चिमुकल्याचा हरभरा गिळल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय.
सुजय बिजूरकर असं या चिमुकल्याचं नाव आहे. सुजयच्या दुर्दैवी मृत्यूमुळं बिजूरकर कुटुंबावर दुःखाचा ड़ोंगर कोसळलाय. या घटनेनंतर परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जातेय.
सुजय हा आपल्या राहत्या घरामध्ये खेळत होता. वर्षभराचा असलेल्या सुजयच्या हाती हरभरा लागला आणि त्याने तो तोंडात टाकला.
सुरुवातीला ही गोष्ट घरातील कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, काही क्षणात त्याला ठसका लागला आणि सुजयला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. घरातल्या मंडळीनी नजिकचं रुग्णालय गाठलं परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि सुजयला मृत्यूनं जवळ घेतल.