नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असून काल दिवसभरात चार सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
पेठ परिसरात भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ परिसराच्या आसपास भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जात आहे. वारंवार जाणवणाऱ्या या सौम्य धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, या धक्क्यांची तीव्रता कमी असल्याने मोठ्या नुकसानीची माहिती सध्या समोर आलेली नाही. भूगर्भातील हालचालींमुळे निर्माण झालेला दाब अशा सौम्य धक्क्यांच्या माध्यमातून बाहेर पडत असावा, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
भूकंपाच्या धक्क्याने शाळेची भिंत कोसळली
दरम्यान, पेठ तालुक्यातील पाहुचीवाडी येथे भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी शाळेची एक भिंत कोसळल्याची घटना घडली. इमारतीच्या इतर भिंतींनाही तडे गेले असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या शाळेत तब्बल 265 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांचे वर्ग वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी भरवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.