नाशिक: राज्यात वाढत्या अपघातांच्या मालिकेत आणखी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी परिसरात कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही घटना काल रात्री घडली असून मृत सर्व प्रवासी दिंडोरी येथील रहिवासी असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते आणि एका कार्यक्रमावरून परतत असताना हा भीषण अपघात घडला. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली आहे.
नियंत्रण सुटून कार विहिरीत कोसळली
प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट विहिरीत कोसळली. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, ज्यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातामधील मृतांची नावे
या अपघातामध्ये एकाच दरगोडे कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे (वय 32), रेशमा सुनील दरगोडे (27), आशा अनिल दरगोडे (32), गुणवती सुनील दरगोडे (11), श्रेयश अनिल दरगोडे (11), श्रावणी अनिल दरगोडे (11), सृष्टी अनिल दरगोडे (14), समृद्धी राजेंद्र दरगोडे (7), श्रद्धा अनिल दरगोडे (13) या नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व मृत इंदोरे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील रहिवासी होते.
बचाव कार्यात अडथळे
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याने प्रयत्न अपयशी ठरले.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाचा निष्काळजीपणा, वेग किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कोणते कारण होते, याचा तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.