सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील कॅनॉल रोड परिसरात गॅंगवॉरमध्ये तिघांची हत्या झाली आहे. एकाला संपवण्यासाठी दोघंजण आलेले असताना या दोघांसहित ज्याला मारायला आले होते त्याचीदेखील हत्या झाली आहे. त्यामुळे या तिहेरी हत्याकांडाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये मागील अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. या दोन गँगमध्ये झालेल्या गँगवॉरमधून तिघांची हत्या झाली आहे. तर इतर पाच जण जखमी आहेत.यामध्ये अर्जित सिंघ चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ असं हल्ल्यात मृत पावलेल्या तिघांची नावं आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही गॅंगमध्ये वर्चस्वामुळे वाद सुरू होता. सदर प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झाला. यावेळी अर्जित आपल्या मित्रासह डी मार्ट येथून बुलेटवरुन जात होता. याचवेळी दबा धरलेल्या अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी तलवारीने हल्ला केला. यात अर्जितचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याच ठिकाणी अर्जित सोबत असलेल्या साथीदारांनी अरबाजवर चाकू आणि खंजीरने वार केले. यात अरबाजचा देखील मृत्यू झाला.
यानंतर लगेचच अर्जित याच्या भावाने रूग्णालयात जाऊन साई लाला गँगच्या आवेझ याचा खून केला.दोन्ही गँगमधील वादाच्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत. एकाच रात्रीत अशाप्रकारे तीन जणांची हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.