मुंबई: आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम किसान' योजनेच्या मदतीनंतर आता राज्य सरकारनेही तिजोरीचे दरवाजे उघडले असून, 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या आठव्या हप्त्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या हप्त्याची चातकासारखी वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे ऐन गरजेच्या वेळी मिळालेली मोठी 'आर्थिक मदत' ठरणार आहे.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वितरित करण्यात आला होता. केंद्राची ही मदत मिळाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे लागले होते. राज्य सरकारने या संदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित करून शेतकऱ्यांच्या या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे.
प्रशासकीय स्तरावर निधी वितरणाला मंजुरी मिळाल्यामुळे आता केवळ तांत्रिक सोपस्कार उरले असून, बळीराजाच्या बँक खात्यात लवकरच 'लक्ष्मी' जमा होणार आहे.
हेही वाचा: MPs Suspension Revoked: विरोधी पक्षांना मोठा दिलासा; 8 खासदारांचे निलंबन अखेर मागे
शासकीय निर्णयानुसार, ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी सुमारे एक हजार 774 कोटी रुपयांचा अवाढव्य निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी म्हणजे केवळ आकडा नसून, तो राज्यातील अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणारा शासनाचा सन्मान आहे. येत्या तीन ते चार दिवसांत थेट लाभ हस्तांतरण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आतापर्यंत या महत्त्वाकांक्षी योजनेचे सात हप्ते यशस्वीरीत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, मजुरी आणि इतर अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी या हप्त्याचा मोठा आधार मिळतो. शेतीकामांच्या लगबगीत हा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या हाती पडणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही यामुळे उभारी मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण आहे आणि आधार संलग्नता सक्रिय आहे, अशा पात्र लाभार्थ्यांच्या मोबाईलवर लवकरच 'क्रेडिट'चा संदेश धडकणार आहे. नैसर्गिक संकटे आणि बाजारभावातील चढ-उतार सोसणाऱ्या बळीराजाला सरकारचा हा वाटा एक आश्वासक पाठबळ देणारा ठरेल. एकूणच, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून, लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमलणार आहे.