नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच नागपूरमध्ये सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून घातपाताचा धोका वर्तवण्यात आला आहे. अधिवेशन आजपासून सुरू होत असल्याने हा अलर्ट अधिक गंभीर मानला जात असून पोलिसांच्या सुरक्षेची जबाबदारी आणखी वाढली आहे.
हिवाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर मोर्चे, धरणे आणि आंदोलनांची नोंद होणार असल्याने पोलिसांवर दुहेरी ताण निर्माण झाला आहे. एका बाजूला आंदोलकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संभाव्य दहशतवादी धोक्याचा सामना करण्यासाठी उच्च सतर्कता पातळी राखावी लागत आहे. सुरक्षा यंत्रणांनी शहरातील संवेदनशील भागांवर अधिक लक्ष केंद्रित केले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिवेशन परिसरात करडी नजर ठेवली जात आहे.
हेही वाचा: Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशन वादळी होणार; राज्यभरातून आंदोलकांची नागपूरकडे धाव
सीसीटीव्ही नेटवर्क मजबूत करण्यात आले आहे तसेच गुप्तचर विभाग सतत हालचालींचे विश्लेषण करत आहे. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली आहे. SRPF च्या 5 तुकड्या, तसेच होमगार्डसह 10,000 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमले गेले आहेत. गरज भासल्यास अतिरिक्त फोर्सही तैनात करण्याची तयारी आहे.
सुरक्षा यंत्रणांचे लक्ष सातत्याने अधिवेशन परिसर, सरकारी कार्यालये, महत्त्वाचे प्रवेशद्वार आणि मोर्चांच्या मार्गांवर केंद्रित आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याची विनंती केली आहे. दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आंदोलनांमुळे नागपूरमध्ये सुरक्षेचे कवच उभारण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशन निर्विघ्न पार पडावे यासाठी सर्व स्तरांवर सज्जता ठेवण्यात आली आहे.