जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
बाहेर जाताना आपण नेहमी घराला कुलूप लावतो आणि बिनधास्त कोठेही निघून जातो. पण, तुमच्या घरावर कोणीतरी नजर ठेऊन आहे. हे विसरुन जाऊ नका. अशाच प्रकराची घटना नागपूरच्या नंदनवन ठाण्याअंतर्गत घडली आहे. घरात कुणीही नसल्याची संधी साधून घराचे कुलूप तोडून घरात चोरी करतांना चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. चोरट्याला दुसरे तिसरे कोणी नाही तर, घरमालकानेच रंगेहात पकडून तेथील स्थानिक नागरिकांनी चोप दिला. चोरी करण्याकरता चोरट्याने घराच्या छतावरून प्रवेश केला. घरात लाईट लावून चोरी करीत असताना अचानक घरमालक घरी पोहोचला असता चोरट्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यात तो चोरी करताना रंगेहात पकडल्यानंतर घरमालकासह नागरीकांनी त्याला चोप देत नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन केले.
अभय भाऊराव धारगावे (23) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. घरमालक धर्मपाल कार्तिक पाटील (32) यांची पत्नी डागा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे. त्यामुळे ते दवाखान्यात गेले होते. घराला कुलूप लावलेले दिसल्याने चोरट्याने हात साफ करण्यासाठी घरात प्रवेश केला. बुधवारी रात्री दहा च्या सुमारास धर्मपाल पत्नीला जेवण नेऊन देण्यासाठी घरी परत आले. त्यांना घरात लाईट लावल्याचे दिसले त्यामुळे त्याचा संशय झाला घरात कोणीतरी आहे. त्यांनी बघितले असता चोर घरात चोरी करताना आढळला. घरमालकाला पाहताच आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, धर्मपाल यांनी त्याला पकडले आणि शेजार्यांना आवाज दिला. शेजारी धावत घरी आले आणि अभयची चांगली धुलाई केली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यावर कारवाई करत नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.