जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपुरात गुंडांना जरब बसवण्याऐवजी पोलीसच गुंडांच्या टोळक्यात घुसून तोडफोड करत असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. नागपुरातील खरबी भागात शनिवारी रात्री मनोज घोडे नावाचा पोलीस कर्मचारी आपल्या काही गुन्हेगार मित्रांसह आर बी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्या ठिकाणी नशेत असलेल्या मनोज आणि त्याच्या गुंड मित्रांचा रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला.
रागावलेल्या गुंडांनी त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करणं सुरु केलं. टेबल खुर्ची फेकल्या, काचा फोडून टाकल्या, मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्यानंतर सर्व गुंड तिथून आरामात निघून गेले. दरम्यान, पोलीस कर्मचारी आणि त्याच्या गुंड मित्रांची ही गुंडगिरी सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद झाली. आर बी रेस्टॉरंटच्या मालकाच्या तक्रारीवर पोलिसांनी मनोज घोडे आणि त्याच्या 8 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.शिवाय पोलीस कर्मचाऱ्याची ही गुंडगिरी पाहून पोलीस आयुक्तांनी मनोज घोडेला निलंबितही केलंय.