नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेत (एनजीओ) काम करणाऱ्या तरुणींवर परधर्मीय धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित एनजीओच्या प्रमुखाला अटक केली आहे. या घटनेमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’ नावाची ही संस्था 2010 पासून कार्यरत असून समाजातील वंचित आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. या संस्थेचे स्वयंसेवक विविध भागांमध्ये जाऊन मुलांना शिकवण्याचे काम करतात. त्यामुळे अनेक तरुणी या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र, या संस्थेत काम करणाऱ्या काही तरुणींनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तक्रारकर्त्या तरुणींच्या म्हणण्यानुसार, संस्थेचा प्रमुख रियाज काजी (वय 48) हा 23 ते 26 वयोगटातील काही हिंदू तरुणींवर विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता. नमाज पठण करणे, रोजे पाळणे, दुवा मागणे तसेच एकमेकांना अभिवादन करताना विशिष्ट शब्द वापरण्याचा आग्रह त्यांच्यावर करण्यात येत होता. संबंधित तरुणींनी आपल्या वैयक्तिक श्रद्धांचा हवाला देत या गोष्टींना नकार दिल्यानंतरही हा दबाव कायम ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका तरुणीने संस्थेच्या प्रमुखाने स्वतःशी गैरवर्तन केल्याचाही गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रियाज काजी याला अटक केली. न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. तसेच, संस्थेमध्ये यापूर्वी काम करून नोकरी सोडून गेलेल्या महिलांशीही संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. त्यांनी नोकरी का सोडली, त्यांच्यावरही अशाच प्रकारचा दबाव होता का, याची चौकशी केली जात आहे.
याशिवाय, या संस्थेला मिळणाऱ्या निधीचा स्त्रोत काय आहे, तसेच संस्थेच्या कामकाजामागील उद्देश काय आहे, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे राज्यातील इतर भागांतही अशाच प्रकारच्या तक्रारींची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत घडलेल्या वादग्रस्त प्रकरणानंतर राज्यात आधीच चर्चा सुरू असताना नागपूरमधील या घटनेने चिंता आणखी वाढवली आहे. या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे.