Dr Hedgewar Flyover Nagpur: उपराजधानी नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून शहरातील सर्वात लांब अशा इंदोरा ते दिघोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून या उड्डाणपुलाला आद्य सरसंघचालक 'डॉ. केशव बळीराम हेडगेवार' यांचे नाव देण्यात आले आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसचे माजी खासदार गेव्ह आवारी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात या उपस्थितीची विशेष चर्चा रंगली होती.
शहरातील महत्त्वाच्या 5 चौकांना जोडणारा उड्डाणपूल
नागपूरमधील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल शहराच्या पायाभूत सुविधांमधील एक मैलाचा दगड ठरणार आहे. तब्बल 8.9 किलोमीटर इतकी प्रचंड लांबी असलेल्या या महाकाय पुलाच्या उभारणीसाठी सुमारे 998.27 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. हा पूल कमाल चौक, रेशीमबाग, सक्करदरा, भांडे प्लॉट आणि दिघोरी नाका या अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या 5 प्रमुख भागांना थेट जोडतो. यामुळे मध्य व पूर्व नागपूरमधील दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – Nashik: नांदगावमध्ये 8 महिन्यांची चिमुकली बेपत्ता; संशयिताचा मृत्यू, आजोबाही गायब, पोलिसांसमोर मोठं आव्हान
वेळ अन् इंधनाची होणार मोठी बचत
या उड्डाणपुलामुळे नागपूरकर नागरिकांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ प्रचंड प्रमाणात वाचणार आहे. पूर्वी इंदोरा ते दिघोरी या मार्गावर प्रवास करताना सिग्नल आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना 30 मिनिटांहून अधिक वेळ लागत असे. मात्र, आता हा संपूर्ण मार्ग उड्डाणपुलावरून मोकळा झाल्याने हाच प्रवास अवघ्या 8 ते 9 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. प्रवासाच्या वेळेत तब्बल 20 ते 22 मिनिटांची बचत होणार असल्याने नागरिकांचे इंधन आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. लोकार्पणानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला असून नागपूरच्या शहर विकासाला या पुलामुळे नवी गती मिळणार आहे.