Nagpur Crime: प्रेयसीला भेटायला गेला अन्…; नागपुरात तरुणाची निर्घृण हत्या, तरुणीच्या वडिलांनी…

नागपूरच्या कामठीतील प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्य आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे

Nagpur Crime: प्रेयसीला भेटायला गेला अन्…; नागपुरात तरुणाची निर्घृण हत्या, तरुणीच्या वडिलांनी…

नागपूर: कामठीतील कुंभारे कॉलनी परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाची ओळख जमशेर उर्फ जम्मु मुनीर खान पटेल अशी झाली असून, या प्रकरणात मुख्य आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांसह नागरिकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलैच्या रात्री जमशेर हा आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कुंभारे कॉलनी परिसरात गेला होता. याच दरम्यान संबंधित तरुणीचे वडील विजय उर्फ 'टायसन' नामदेव डोंगरे यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात जमशेर गंभीर जखमी झाला.

हेही वाचा: Neet Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयिताला सीबीआयकडून क्लिन चीट; तपासाला नवे वळण

हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी जमशेरने घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचा पाठलाग करून आरोपीने ऑटो रिक्षाने धडक दिल्याचाही आरोप समोर आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्यक्षदर्शींनीही या घटनेबाबत धक्कादायक माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.

गंभीर जखमी अवस्थेत जमशेरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय उर्फ टायसन डोंगरे हा तडीपार असतानाही शहरात मुक्तपणे वावरत होता, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. तडीपार आदेश असलेल्या व्यक्तीवर प्रभावी देखरेख ठेवण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हेही वाचा: TET Exam Paper Leak Update : भिवंडी पोलिसांची थरारक कारवाई; महिन्याभराच्या प्रयत्नांनंतर पाटणा येथून मुख्य आरोपी अटकेत

घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केली आहे. आरोपीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही स्थानिकांनी दिला आहे.

या घटनेमुळे नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपीला मदत करणारे इतर कोणी आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number