नागपूर: नागपूरात अज्ञात आजाराने लहान मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना होत आहेत. आज आणखी एका चिमुकलीचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील परासिया येथील दोन वर्षांची योजिता ठाकरे ही मुलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिला नागपुरच्या लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लहान मुलांच्या मृत्यूंचा आकडा दहावर पोहोचला आहे.
मध्य प्रदेशातील योजिता ठाकरे हिला काही दिवसांपूर्वी तिला ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. पण प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला नागपूरात आणले. योजिताला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. तरीही प्रकृती खालावल्याने शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
काही दिवसांपासून नागपूर आणि मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागांमध्ये लहान मुलांच्यात अज्ञात आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या दहांपैकी सहा प्रकरणे मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. नागपूर आणि छिंदवाडा परिसरात Acute Encephalitis Syndrome (AES) या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. मृत बालकांमध्ये महाराष्ट्रातील चार मुलांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांचा वयोगट 0 ते 16 वर्षे असा आहे. नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये या प्रकरणांमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान मुलांच्या मृत्यू मागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी हा व्हायरल संसर्गाचा प्रकार असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. स्वतंत्र पथक नेमून नागपूर व मध्य प्रदेशातील आरोग्य विभागाकडून याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या मुलांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून पालकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. लहान मुलांना ताप किंवा गंभीर लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.