नवी दिल्ली: भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. या तणावाच्या मुळाशी आहे आयपीएल 2026 मधील मुस्तफिजुर रहमानचा वाद. कोलकता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजुरला 9 कोटी 20 लाख रुपयांच्या अवाढव्य किमतीत खरेदी केले होते, मात्र भारतात होणाऱ्या बांगलादेशविरोधी निदर्शनांमुळे बीसीसीआयने (BCCI) त्याला संघातून बाहेर करण्याचे आदेश दिले. या एका निर्णयाने दोन्ही देशांमधील क्रिकेट युद्ध पेटले आणि आता या आगीत तेल ओतण्याचे काम आपला शेजारील शत्रू देश पाकिस्तान करत आहे. स्वतःची आर्थिक आणि क्रिकेटमधील स्थिती डबघाईला आलेली असताना, पाकिस्तानने बांगलादेशचे सामने आयोजित करण्याचा हास्यास्पद प्रस्ताव आयसीसीला (ICC) दिला आहे.
मुस्तफिजुर ठरला वादाचा केंद्रबिंदू
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात भारतात संतापाची लाट आहे. सोशल मीडियावर मुस्तफिजुर रहमानवर बहिष्कार टाकण्याची मागणी झाल्यानंतर बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव त्याची सुटका केली. या निर्णयाचा प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) थेट आयसीसीकडे धाव घेत, टी-20 विश्वचषक 2026 मधील आपले सामने भारतातून हलवण्याची मागणी केली. बांगलादेशचे तीन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणि एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. मात्र, आयसीसीने त्यांची ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.
पाकिस्तानचा 'फुकटचा' सल्ला आणि वास्तव
नेहमीच भारताच्या विरोधात संधी शोधणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या वादात उडी घेत जाहीर केले की, जर बांगलादेशला भारतात खेळायचे नसेल, तर आम्ही त्यांचे यजमानपद भूषवण्यास तयार आहोत. ज्या देशात स्वतःच्या संघाची सुरक्षा चर्चेत असते आणि जिथे आंतरराष्ट्रीय संघ जायला घाबरतात, तो पाकिस्तान आता 'सुरक्षेचे' कारण देत बांगलादेशला आश्रय देऊ पाहत आहे. आयसीसीने पाकिस्तानचा हा प्रस्ताव गांभीर्याने न घेता, त्यांना त्यांच्या मर्यादेत राहण्याचा एकप्रकारे इशाराच दिला आहे.
शेड्यूलमध्ये बदल अशक्य, पाकची खेळी फेल
2026 चा टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत आहेत. पाकिस्तानने यापूर्वीच त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळण्याचे मान्य केले आहे आणि तसे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. आता अचानक बांगलादेशचे सामने पाकिस्तानात नेणे अशक्य आहे. हॉटेल बुकिंगपासून ते ब्रॉडकास्टिंग राइट्सपर्यंत सर्व काही ठरले असताना, पाकिस्तानचा हा प्रयत्न म्हणजे केवळ "आग लावून लांबून तमाशा पाहण्याचा" प्रकार असल्याचे क्रीडा विश्लेषकांचे म्हणणे आहे.
शक्तिहीन पाकिस्तानचा पोकळ आत्मविश्वास
पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती पाहता त्यांना स्वतःचे सामने आयोजित करणे कठीण जात आहे, तरीही भारताला डिवचण्यासाठी ते अशा घोषणा करत आहेत. बांगलादेशने शेवटच्या क्षणी घेतलेली ही भूमिका आणि त्याला पाकिस्तानने दिलेली फूस, यामुळे आशियाई क्रिकेटमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, आयसीसीच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानची ही 'फेक' खेळी तोंडावर आपटली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, क्रिकेट आणि सुरक्षा या दोन्ही बाबींवर तडजोड केली जाणार नाही.