जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. सर्वच ठिकाणी मुंबईकर अडकून पडला आहे. रेल्वे-रस्ते वाहतूकीवर पावसाचा मोठा फटका बसला आहे. कालपासून कोसळणाऱ्या पावसाने रुद्र रुप धारण करत मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. पण प्रत्येकवेळी मुंबईने एकमेकांच्या साथीने येणाऱ्या संकटांशी दोन हाथ केले आहे.
कालपासूनच सुरु असलेल्या पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी मंगळवारी रात्री लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानं जेवणाची व्यवस्था केली होती. मुंबईमध्ये अनेक सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घेत नागरिकांना मदतीचा हात दिला होता. यावेळी लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मदत कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी अंधेरीचा राजा या गणेश मंडळानं पावसात अडकलेल्या नागरिकांसाठी चहा आणि नाश्ता तसेच जेवणाची सोय केली होती. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाले होते. रेल्वेसेवादेखील विस्कळीत झाली होती, त्यामुळे लोकांच्या सोयीकरता अंधेरीच्या राजानं जेवणाची सोय केली होती.
मुंबईत गेल्या काही तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. अशा परिस्थितीत संपर्काचं प्रभावी माध्यम असलेल्या फेसबुकने काही फीचर्स सुरु केले आहेत. या फिचर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमची खुशाली आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना कळवू शकता, त्यासाठी द फ्लोडींग इन मुंबई हे ऑप्शन फेसबुककडून देण्यात आलं आहे. या ऑप्शनवर जाऊन विचारलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून तुम्ही तुमची सध्याची परिस्थिती आपल्या कुटुंबियांना कळवू शकता. तसेच तुम्हाला पावसामुळे अडकलेल्या लोकांना मदत करायची असेल तर तुम्ही इथूनच संपर्क साधून गरजूंना वेगवेगळ्या प्रकारची मदतही करू शकता.
या सगळ्या कठीण परिस्थितीतही मुंबईकर मात्र जमेल त्या प्रकारे एकमेकांना मदतीचा हाथ पुढे करत, अजूनही मुंबईकरांमधील माणूसकी जिवंत असल्याचच दाखवून दिले आहे.