मुंबई : झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. यानंतर पोलीस तसेच बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बॉम्ब शोधण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. व्यापाऱ्यांना तात्पुरते कामकाज बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षेला प्राधान्य देत व्यापाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे झवेरी बाजार ?
झवेरी बाजार ही मुंबईतील सोन्याचांदीची आणि हिऱ्यांची बाजारपेठ आहे. दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथे झवेरी बाजार आहे. अरुंद गल्ल्यांचे जाळे, सोनं, चांदी, हिरे, रत्न, जडजवाहिर, दागिने विकणारी शेकडो दुकानं झवेरी बाजारात आहेत. भारतातील एकूण सोन्याच्या व्यापारापैकी सुमारे ६५ टक्के व्यापार या बाजारातून होतो. झवेरी बाजारात आतापर्यंत तीन वेळा बॉम्बस्फोट झाले आहेत. पहिल्यांदा १२ मार्च १९९३, नंतर २५ ऑगस्ट २००३ त्यानंतर १३ जुलै २०११ रोजी झवेरी बाजारात बॉम्बस्फोट झाले आहेत.