मुंबईच्या पायधुनी परिसरात जेवणात बिर्याणी खाल्यानंतर कलिंगड खाल्लेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 26 एप्रिल रोजी घडली असून या घडनेने सर्वत्र खळबळ माजली. यानंतर पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन तत्पर्तेने या प्रकरणाचा शोध लावत आहे. या घटनेनंतर आस-पासच्या परिसरातील फळविक्रेते आणि कलिंगड विक्रेत्यांची कसून चौकशी केल्यानंतर कलिंगड खाल्यामुळे हे मृत्यू न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
असं असताना या प्रकरणात एक नवीन अपडेट आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपास सुरू केल्यानंतर तापासाद्वारे धक्कादायक बाब समजली आहे. मृत कुटुंब डोकाडिया यांच्या घरातून बिर्याणी, कलिंगड, पाणी, शिजवलेले चिकन आणि खजूर असे एकूण 11 नमुने जप्त करण्यात आले. तसेच मृत कुटुंब डोकाडिया यांच्या शरीरात पोस्टमॉर्टेमदरम्यान “पेनकिलर-सदृश” (वेदनाशामक) हा पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ चांगलंच वाढलं असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न अजूनही तसाच आहे. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून फॉरेन्सिक अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या प्रकरणात विषारी घटक किंवा इतर कारणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात असून, फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबाने 25 एप्रिल रोजी रात्री जेवणात बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून कलिंगड देखील खाल्ले होते. मात्र जेवणानंतर कलिंगड खाल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 एप्रिल रोजी विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 13 आणि 16 वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे.
मृत व्यक्तींची नावं ही अब्दुल्ला डोकाडिया वयवर्षे 40, नसरीन डोकाडिया वयवर्षे 35 आणि त्यांच्या मुली आयशा वयवर्षे 16 व झैनब वयवर्षे 13 अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जेवणात बिर्याणी खाल्यानंतर अवघ्या काही वेळातच कलिंगड खाल्यानंतर त्यांना उलटी, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.