Mumbai Water Crisis: मुंबईकरांवरील पाणीसंकट कायम; 24 तासांत 111 दशलक्ष लिटरची घट, पाणीकपात कायम राहण्याची शक्यता

पावसाचा जोर कमी होताच तलावांतील पाणीसाठ्यात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai Water Crisis: मुंबईकरांवरील पाणीसंकट कायम; 24 तासांत 111 दशलक्ष लिटरची घट, पाणीकपात कायम राहण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे शहरातील 10 टक्के पाणीकपात लवकरच मागे घेतली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, पावसाचा जोर कमी होताच तलावांतील पाणीसाठ्यात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

महापालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, 13 जुलै रोजी सातही तलावांमध्ये 7 लाख 22 हजार 649 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. त्यात 14 जुलैपर्यंत 111 दशलक्ष लिटरची घट झाली असून, एकूण साठा 7 लाख 22 हजार 538 दशलक्ष लिटरवर आला आहे. सलग वाढीनंतर प्रथमच पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनासह मुंबईकरांचेही लक्ष आता पुढील पावसाकडे लागले आहे.

तानसा, मोडक सागर आणि विहार या तलावांतील पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तलावांमध्ये नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने वापराच्या तुलनेत साठा कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात निर्माण झालेला दिलासा काहीसा कमी झाला आहे.

मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा मोठा भार या सात तलावांवर अवलंबून आहे. त्यामुळे तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस पडणे आवश्यक मानले जाते. सध्या शहरात लागू असलेली पाणीकपात हटविण्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला असला, तरी तलाव परिसरात चांगला पाऊस होणे गरजेचे आहे. अन्यथा, पाणीसाठ्यातील चढ-उतार कायम राहिल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन सध्याच्या पद्धतीनेच सुरू ठेवावे लागू शकते.

पाणीसाठ्याची स्थिती

13 जुलै : 7 लाख 22 हजार 649 दशलक्ष लिटर

14 जुलै : 7 लाख 22 हजार 538 दशलक्ष लिटर

24 तासांतील घट : 111 दशलक्ष लिटर
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number