आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने हिवाळी अधिवेशनात मुंबईकरांसाठी महत्त्वाची घोषणा करत झोपडपट्टी पुनर्विकासाला नवी दिशा दिली आहे. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत 17 ठिकाणी ‘एसआरए समूह पुनर्विकास’ प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत निवेदन करताना शिंदे यांनी या योजनेची सविस्तर रूपरेषा मांडली. 50 एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाच्या खासगी, शासकीय आणि निमशासकीय जमिनींवर एकत्रित स्वरूपात झोपडपट्टी पुनर्विकास केला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबईतील अँटॉप हिल, चित्ता कॅम्प (ट्रॉम्बे), कृष्णनगर, टागोरनगर (विक्रोळी), केतकीपाडा (बोरिवली), गोपीकृष्णनगर (दहिसर), ओशिवरा, गोवंडी, चेंबूर, विक्रोळी पार्कसाइट आणि भांडुपसह एकूण 17 प्रमुख परिसरांची निवड करण्यात आली आहे. वनक्षेत्र, कांदळवन, सीआरझेड परिसरात मूळ जागेवर पुनर्विकास शक्य नसल्याने रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी पुनर्वसनाची गरज भासते. यासोबतच गिरणी कामगार, डबेवाले, माथाडी कामगारांसारख्या गरजू घटकांना वेळेत घरे देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरसाठा आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे लाखो झोपडपट्टीवासीयांना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आतापर्यंत लहान आणि विखुरलेल्या एसआरए प्रकल्पांमुळे अनेक योजना रखडत होत्या. मात्र आता संपूर्ण परिसराचा एकत्रित विकास करून त्या भागाचा कायापालट करण्यावर सरकारचा भर आहे. हे प्रकल्प वेळेत आणि गतीने पूर्ण व्हावेत यासाठी राज्य सरकारने स्वतः पुढाकार घेतला असून एमएमआरडीए, सिडको, एमआयडीसी, एमएसआरडीसी, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने संयुक्त उपक्रम तत्त्वावर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात आणखी काही भागांचा समावेश केला जाणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जुन्या आणि धोकादायक इमारतींतील रहिवाशांना तातडीने घरे उपलब्ध व्हावीत, तसेच भविष्यातील प्रकल्पांसाठी घरांची कमतरता भासू नये यासाठी ‘हाउसिंग स्टॉक’ निर्माण करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
या व्यापक निर्णयांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास चालना मिळणार असून नियोजित, सुरक्षित आणि आधुनिक शहरी विकासाच्या दिशेने मुंबई एक पाऊल पुढे टाकणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.