जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व, दहिसर ते डी.एन.नगर, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गांची कामे धडाक्यात सुरू आहेत. या कामांमुळे किमान अडीच वर्षे तरी मुंबईकरांना त्रास सोसावा लागणार आहे.
मेट्रोचा पाया आणि पिलर उभारण्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी बॅरिकेडस उभारण्यात आलेत. म्हणून वांद्रे-कुर्ला-कॉम्प्लेक्स, अंधेरी, डी.एन.नगर, आरे कॉलनी, गोरेगाव या भागांत चांगलीच वाहतूककोंडी जाणवते.
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व तसेच दहिसर ते डी.एन.नगर हे दोन्ही मार्ग एलिव्हेटेड असल्याने पाया खणणे आणि पिलर उभारणे या मुख्य कामांकरिता मुख्य रस्त्यांवरील एक मार्गिका बंद करण्यात आली आहे.
परिणामी गर्दीच्या वेळी या भागातील वाहतुकीचे नियोजनच कोलमडले आहे. तर रात्री 10 नंतर मेट्रोची कामे बंद करण्याचे आदेश असतानाही कामे सुरू ठेवली जात असल्याच्या तक्रारी आहेत.