जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रेल्वे प्रशासन,सामाजिक संस्थांकडून वारंवार जनजागृती करूनही रुळांवरच्या ‘शॉर्टकट’चा मोह प्रवाशांना सुटत नाही. त्यामुळे रेल्वेची धडक लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2016 ते ऑगस्ट 2017 पर्यंत तब्बल 2 हजार 911 जणांना रूळ ओलांडताना आपला प्राण गमवावा लागला आहे.
रूळ ओलांडून होणाऱ्या अपघातांना पूर्णपणे आळा बसावा यासाठी मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. रुळाच्या बाजूला असणाऱ्या झोपडय़ांजवळची संरक्षक भिंत, दोन रुळांच्या बाजूलाच तारांचे कुंपण उभारण्यात आले आहे.
मात्र अनेक वेळा ही भिंत, कुंपण तोडून रूळ ओलांडण्यासाठी वाट मोकळी केली जाते. दोन रुळांमध्ये लोखंडी अडथळ्यांच्या खालून कसरत करून प्रवासी पुढे मार्गस्थ होतात. या सवयीमुळे रुळांवरील अपघातांचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही.
यात सर्वाधिक नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस हद्दीत करण्यात आली आहे. कल्याणमध्ये रुळ ओलांडताना तब्बल 404 जणांचा बळी गेला आहे. त्याखालोखाल ठाणे,कुर्ला,बोरिवली आणि वसई रेल्वे हद्दीत सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.