Missing Link Inauguration: मुंबई-पुणे प्रवास झाला वेगवान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिसिंग लिंक’चं लोकार्पण; ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

Missing Link Inauguration: मुंबई-पुणे प्रवास झाला वेगवान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिसिंग लिंक’चं लोकार्पण; ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

मुंबई: सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या आणि खंडाळा घाटातील वळणांवर रेंगाळणाऱ्या मुंबई-पुणे प्रवासाला आता खऱ्या अर्थाने ‘गती’ मिळाली आहे. घाटमाथ्यावरील निसर्गरम्य सौंदर्यात भर घालत, अत्याधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत आविष्कार आज महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णक्षणी राज्याच्या सेवेत रुजू झाला आहे. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील ‘अंतर’ आणि ‘वेळ’ दोन्ही कमी करणारा गेमचेंजर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आजपासून वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला झाला असून, याच्या लोकार्पणासोबतच महाराष्ट्राच्या शिरपेचात जागतिक विक्रमाचा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, 1 मे 2026 रोजी या बहुचर्चित प्रकल्पाचे दिमाखदार लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्टेअरिंग हाती घेत (ड्राइव्ह करत) या नव्याकोऱ्या बोगद्यातून प्रवासाचा आनंद लुटला. या ऐतिहासिक सोहळ्याला रायगड, पनवेल आणि मावळ परिसरातील प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. मात्र, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील बोगद्याने थेट ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये मिळवलेले स्थान! सहसा डोंगर पोखरताना माती ढासळण्याच्या भीतीने जगात कुठेही 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे बोगदे खणण्याचे धाडस केले जात नाही. मात्र, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अभियंत्यांनी तब्बल 23.5 मीटर रुंदीचा ‘जगातील सर्वाधिक रुंद बोगदा’ साकारण्याचा चमत्कार करून दाखवला आहे. आज उद्घाटनाच्या वेळीच गिनीज समितीकडून या जागतिक विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. अंतर्गत सुरक्षेची कामे पूर्ण झाल्यानंतर या बोगद्याची रुंदी आता 22.33 मीटर इतकी भरते.

हेही वाचा: IPL 2026: विराट कोहलीवर बंदीची टांगती तलवार? पंचांशी घातलेला ‘तो’ वाद पडणार महागात

‘मिसिंग लिंक’चा हा एकूण 13.3 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग खोपोली एक्झिटपासून सुरू होऊन थेट लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत (सिंहगड कॉलेज) जोडला गेला आहे. या मार्गावर दोन महाकाय बोगदे उभारण्यात आले असून, त्यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 8.84 किलोमीटर, तर दुसऱ्या बोगद्याची लांबी 1.68 किलोमीटर इतकी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या ट्रॅफिकवर मात करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी चार मुख्य मार्गिका आणि एक सर्व्हिस लेन अशा तब्बल 5 मार्गिका या बोगद्यात तयार करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एक सुरेख मेळ या प्रकल्पात पाहायला मिळतो. बोगद्याच्या आत अत्याधुनिक सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रगत वायुवीजन प्रणाली (Ventilation) आणि अचूक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी विशेष ‘फायर एग्झिट’ची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकंदरीत, खंडाळ्याच्या घाटातील धोकादायक वळणांना बगल देत, हा प्रकल्प केवळ प्रवास वेगवान आणि सुरक्षितच करणार नाही, तर तो पर्यावरणपूरक बनवण्यातही निर्णायक ठरणार आहे. 

हेही वाचा: TET Court Decision: शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेच सुटणार? सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी उघडले न्यायाचे दरवाजे; 13 मे रोजी होणार आरपारची लढाई

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number