Missing Link: ‘वर्ल्ड क्लास’ मिसिंग लिंकची दोन महिन्यांतच पोलखोल! उद्घाटनानंतर पहिल्याच पावसात पुलावर खड्डे

मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघ्या दोन महिन्यांतच पुलावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Missing Link: ‘वर्ल्ड क्लास’ मिसिंग लिंकची दोन महिन्यांतच पोलखोल! उद्घाटनानंतर पहिल्याच पावसात पुलावर खड्डे

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाचा प्रकल्प म्हणून गाजलेल्या या मार्गावर उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांतच खड्डे पडल्याचे समोर आल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प उभारला आहे. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. उद्घाटनावेळी हा प्रकल्प राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, पहिल्याच पावसाळ्यात या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पुलाच्या सुरुवातीलाच रस्त्यावर खड्डे पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता वाढली आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जुळे बोगदे, ज्यांना जगातील सर्वात रुंद बोगदे म्हणून गिनीज बुकमध्ये स्थान मिळाले आहे. तसेच डोंगरदऱ्यांमधून जाणारा हा मार्ग विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यास सक्षम असल्याचा दावा एमएसआरडीसीकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्याची अवस्था बिघडल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाहनचालकांनी या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली आहे. विशेषतः भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी अशा प्रकारचे खड्डे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा:Bhiwandi: मध्यरात्री भिवंडीत भीषण अग्नितांडव! रस्त्याच्या कडेला उभी असलेली खासगी बस जळून खाक, मोठी जीवितहानी…

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओनंतर प्रकल्पाच्या कामाच्या दर्जाबाबत चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची अशी अवस्था दोन महिन्यांतच कशी झाली, याचे उत्तर संबंधित विभागाने द्यावे, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे.

आता एमएसआरडीसी या प्रकरणावर काय भूमिका घेते, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती केली जाते का आणि कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी केली जाते का, याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number