मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू झाला. गणेश रायते असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते 41 वर्षांचे होते. ड्युटीवर असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश रायते हे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या परिसरात सुरक्षा बंदोबस्तासाठी कार्यरत होते. शनिवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले. रायते यांना रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गणेश रायते हे मुंबई पोलिसांच्या LA 4 युनिटमध्ये कार्यरत होते. उपलब्ध माहितीनुसार, त्यांनी यापूर्वी लष्करात सेवा बजावली होती. त्यानंतर ते मुंबई पोलिस दलात दाखल झाले होते. सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात असतो. त्याच बंदोबस्ताचा भाग म्हणून रायते यांचीही तेथे ड्युटी असल्याची माहिती आहे.