Mumbai Monorail Service: मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार; 7 महिन्यांपासून रखडलेली मोनोरेल नव्या ‘अवतारात’ पुन्हा धावणार; वाचा कधी सुरू होणार?

एमएमआरडीएने मेट्रोच्या धर्तीवर नवीन सिग्नल यंत्रणा आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार झालेले 10 नवीन रेक दाखल केले असून, मे अखेरपर्यंत चाचण्या पूर्ण करून ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे.

Mumbai Monorail Service: मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार; 7 महिन्यांपासून रखडलेली मोनोरेल नव्या ‘अवतारात’ पुन्हा धावणार; वाचा कधी सुरू होणार?

मुंबई: वेगवान शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेली 'पहिली मोनोरेल' आता पुन्हा एकदा वेगाने धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या सात महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद असलेला मोनोरेलचा प्रवास पुन्हा सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंबर कसली आहे. केवळ सेवा सुरू करणे एवढाच उद्देश न ठेवता, या वेळी मोनोरेल अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाने सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याने मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तांत्रिक अडचणींचा 'ब्रेक' आणि सुरक्षेचा 'सिग्नल'

गेल्या वर्षी 20 सप्टेंबर 2025 पासून मोनोरेलची सेवा तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आली होती. यामुळे दक्षिण आणि मध्य मुंबईला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. मात्र, हा सात महिन्यांचा काळ एमएमआरडीएने या प्रकल्पाच्या 'कायापालट' करण्यासाठी वापरला आहे. आता मोनोरेलमध्ये मेट्रोच्या धर्तीवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीमुळे दोन गाड्यांमधील अंतर आणि वेगावर अचूक नियंत्रण मिळवणे शक्य होणार असून, अपघाताची शक्यता शून्यावर येणार आहे.

चाचण्यांचा धडाका आणि सुरक्षा प्रमाणपत्र

सध्या मोनोरेल मार्गावर नवीन सिग्नल यंत्रणेच्या जोडीने विविध तांत्रिक चाचण्या घेतल्या जात आहेत. यामध्ये गाडीचा वेग, आपत्कालीन ब्रेक यंत्रणा, उपकरणांची कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या सर्व निकषांची बारकाईने तपासणी केली जात आहे. एमएमआरडीएच्या वतीने ही चाचणी प्रक्रिया मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्यानंतर अंतिम 'सुरक्षा प्रमाणपत्र' मिळताच मोनोरेल पुन्हा एकदा प्रवाशांच्या दिमतीला हजर होईल.

हेही वाचा: Digital Property Card: सातबारासाठीचे हेलपाटे आता कायमचे थांबणार; शहरांमध्ये समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांना मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड'; महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय

'मेक इन इंडिया'ची ताकद आणि नवीन रेक

2014 मध्ये जेव्हा देशातील पहिली मोनोरेल मुंबईत धावली, तेव्हापासून या प्रकल्पाला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र, आता 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत भारतातच तयार करण्यात आलेले 10 नवीन मोनो रेक मुंबईत दाखल झाले आहेत. हे नवीन रेक केवळ आधुनिकच नाहीत, तर प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सुखकर करणारे आहेत. स्वदेशी बनावटीच्या या गाड्यांमुळे सुट्या भागांची टंचाई आणि देखभालीच्या समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबईकरांच्या प्रवासाला मिळणार गती

वडाळा ते चेंबूर आणि पुढे जैकब सर्कलपर्यंत पसरलेला हा मार्ग मध्य मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मेट्रो आणि लोकल ट्रेनला जोडणारा दुवा म्हणून मोनोरेलकडे पाहिले जाते. एमएमआरडीने ठरवलेल्या नियोजनानुसार सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास, जून महिन्याच्या सुरुवातीला मुंबईकर पुन्हा एकदा हवेतून या सुखद प्रवासाचा आनंद घेऊ शकतील. 'देर आए दुरुस्त आए' या उक्तीप्रमाणे, अधिक सज्ज होऊन येणारी मोनोरेल मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नवी उभारी देईल, यात शंका नाही.

हेही वाचा: Tamil Nadu Election 2026: तामिळनाडूत राजकारण तापलं! रंगलं 'रिसॉर्ट पॉलिटिक्स', अण्णाद्रमुकचे 28 आमदार वॉच मोडवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number