जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षारक्षकांनी संप पुकारला आहे. मुंबई मेट्रो सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्डचे कर्मचारी मंगळवारी सकाळ पासून संपावर गेले आहेत. राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या करारावर घेतलेल्या या कामगारांना गृह खात्याच्या अंतर्गत घेऊन त्यांना पोलिसांसारखा दर्जा मिळावा, पगार योग्य पद्धतीने मिळावा या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. या संपामुळे मुंबई मेट्रोसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
राज्यभरात 9 हजार कर्मचारी आहेत. त्यांना महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात केले आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बल ही कंपनी येते. कंत्राटी पध्दतीने ही कामे चालतात. मेट्रो, विमानतळ, टोलनाका, टाटा हॉस्पिटल, मोनो रेल, शिर्डी विमानतळ, तसेच राज्यातील अनेक देवस्थानांना ही कंपनी सुरक्षा पुरवते.
सुरक्षा रक्षक संपावर गेल्याने घाटकोपर स्थानकातच त्याची जाणीव होऊ लागली आहे. मेट्रो मध्ये जाण्यासाठी प्रवाश्यांच्या रांगा लागल्या आहेत. खासगी सुरक्षा रक्षक तात्पुरते नेमण्यात आले आहेत. मात्र प्रवाश्यांची तपासणी न करताच आत सोडण्यात येत आहे.