मुंबई: 2026 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा कायापालट करणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या बाबतीत हे वर्ष 'गेम चेंजर' ठरणार आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांतील प्रवाशांचा प्रवास सुसाट करण्यासाठी तब्बल तीन नवीन मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल होत असून, यामुळे वाहतूक कोंडीतून मोठी सुटका मिळणार आहे.
मुंबईत उभारल्या जाणाऱ्या 350 किमीच्या भव्य मेट्रो जाळ्यातील 70 किलोमीटरचा टप्पा आधीच कार्यरत आहे. मात्र, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 22 किलोमीटरचा नवीन टप्पा जोडला जाणार आहे. यात उत्तर मुंबईला भाईंदरशी जोडणारी मेट्रो 9, ठाण्यातील घोडबंदरचा प्रवास सुसह्य करणारी मेट्रो 4A आणि पूर्व मुंबईला जोडणारी मेट्रो 2B अशा तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
विशेषतः पश्चिम मुंबईला थेट पूर्व किनारपट्टीशी जोडणाऱ्या मेट्रो 2B कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ईएसआयसी नगर ते मंडाळा या पूर्ण मार्गापैकी मंडाळा ते चेंबूर हा पहिल्या टप्प्यातील पाच स्थानकांचा मार्ग पूर्णपणे सज्ज झाला आहे. मंडाळा, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूरमधील डायमंड गार्डन ही स्थानके पूर्व उपनगरातील प्रवाशांची जीवनवाहिनी ठरणार असून, 2026 च्या सुरुवातीलाच या मार्गावर मेट्रो धावू लागेल.
दुसरीकडे, मिरा-भाईंदरकरांचे मेट्रोचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. दहिसर (पूर्व) ते भाईंदर अशा मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्यातील 4 स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, ही मार्गिका आचारसंहितेनंतर लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होईल. दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव या भागातील प्रवाशांना आता मुंबईत येण्यासाठी लोकल ट्रेनवर आधारित राहणं कमी करता येणार आहे.
ठाणेकरांसाठी सुद्धा 'मेट्रो 4A' म्हणजेच गायमुख-कासारवडवली-घाटकोपर ही मार्गिका आनंदाची बातमी घेऊन येत आहे. जरी प्रशासनाने चाचणीचा वेग वाढवला असला, तरी 2026 च्या मध्यापर्यंत गायमुख ते कॅडबरी जंक्शन या 10 महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान मेट्रो धावण्याची चिन्हे आहेत. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या विळख्यातून ठाणेकरांना बाहेर काढण्यासाठी ही मार्गिका सर्वात प्रभावी ठरेल.
एकूणच, अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, वातानुकूलित प्रवास आणि कमी वेळात लांबचा पल्ला गाठण्याची सोय यामुळे मुंबईची नवी मेट्रो मार्गिका खऱ्या अर्थाने मुंबईकरांचा 'हॅपी न्यू इयर' साजरी करणार आहेत. मुंबई मेट्रोच्या या आधुनिकीकरणामुळे मुंबईचा वेग आता अनेक पटीने वाढणार आहे.