Mumbai Local Megablock: सावधान! उद्या मुंबईची ‘लाईफलाईन’ घेणार विसावा; तिन्ही लाईनवर एकाच वेळी ब्लॉक, वेळापत्रक तपासूनच बाहेर पडा

प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai Local Megablock: सावधान! उद्या मुंबईची ‘लाईफलाईन’ घेणार विसावा; तिन्ही लाईनवर एकाच वेळी ब्लॉक, वेळापत्रक तपासूनच बाहेर पडा

मुंबईची 'लाईफलाईन' मानली जाणारी लोकल ट्रेन या रविवारी जणू काही तासांची विश्रांती घेण्याच्या तयारीत आहे. सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा किंवा खरेदीचा बेत आखत असाल, तर आधी तुमच्या रेल्वेच्या वेळापत्रकावर नजर टाकणे फायद्याचे ठरेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी एक मोठा 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक केवळ काही तासांचा नसून पश्चिम रेल्वेवर तर तो चक्क शनिवार रात्रीपासून ते रविवारच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी मुंबईकरांनी प्रवासाचे आधीच नियोजन करणे गरजेचे आहे.

या दुरुस्ती सत्राचा सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना बसणार आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून रविवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत हा प्रदीर्घ ब्लॉक चालणार आहे. तसेच, अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री एक ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत काम चालणार आहे.

या महत्त्वपूर्ण तांत्रिक कामामुळे बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे बंद राहतील. परिणामी, काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील, तर काही गाड्या अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांवरच थांबवल्या जातील.

हेही वाचा: Nirmala Sitharaman: निर्मला सीतारामन यांचा खुलासा! इंधन दर स्थिर राहणार, नागरिकांना दिलासा

पश्चिम रेल्वेच्या या ब्लॉकदरम्यान लोकलच्या मार्गातही मोठे बदल करण्यात आले आहेत. धीम्या मार्गावरील सर्व लोकल गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावरून धावतील. विशेष म्हणजे, डाऊन जलद मार्गावरील ब्लॉकच्या वेळी फलाट उपलब्ध नसल्यामुळे डाऊन दिशेकडील गाड्या राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर थांबणार नाहीत. त्या अंधेरी ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गावरून धावतील. प्रवाशांची गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी, 15 डब्यांच्या सर्व धीम्या लोकल अंधेरी आणि बोरिवली दरम्यान दोन्ही दिशांना 'फास्ट लोकल'प्रमाणे चालवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही रविवारी या देखभाल दुरुस्तीचा सामना करावा लागणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 वाजून 5 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटे या वेळेत ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटीवरून सकाळी 10 वाजून 4 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 32 मिनिटे या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप या स्थानकांवर थांबून मुलुंडनंतर पुन्हा धीम्या मार्गावर येतील. ठाण्याहून सकाळी 11 वाजून 7 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 51 मिनिटे या वेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप धीम्या गाड्याही याचप्रमाणे अप जलद मार्गावरून धावतील.

नवी मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरही रविवारी सन्नाटा पाहायला मिळेल. ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटे ते सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे. या काळात ठाण्याहून वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या (सकाळी 10 वाजून 35 मिनिटे ते दुपारी 4 वाजून 7 मिनिटांपर्यंत ) आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाण्याकडे येणाऱ्या (सकाळी 10 वाजून 25 मिनिटे ते दुपारी 4 वाजून 9 मिनिटांपर्यंत) सर्व लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना बस किंवा इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा लागेल.

रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणारी ही देखभाल दुरुस्ती भविष्यातील सुरक्षित आणि विनाअडथळा प्रवासासाठी अत्यंत आवश्यक आहे. तरीही, या ऐन सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या ब्लॉकमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळेचे योग्य गणित मांडूनच घराबाहेर पडावे, जेणेकरून मनस्ताप टळेल. 

हेही वाचा: Marine Drive Road: मुंबईकरांची ट्रॅफिकच्या चक्रव्यूहातून सुटका; 'ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह' प्रवासाला लागणार फक्त 5 मिनिटे, कधी पूर्ण होणार प्रकल्प?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number