मुंबई: मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये जागेवरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होत एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात संबंधित प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना मध्यरात्री सुमारे १२.१० वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, लोकलच्या जनरल डब्यात दोन प्रवाशांमध्ये जागेवरून वाद सुरू झाला होता. काही वेळातच हा वाद अधिक चिघळला.
ट्रेन ठाकुर्ली स्थानकात पोहोचताच तीन जणांनी एका प्रवाशावर अचानक कोयत्याने हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्यामुळे डब्यात एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी ठाकुर्ली स्थानकावर उतरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ हालचाल करत जखमी प्रवाशाला कल्याण स्थानकावर ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.