Mumbai Local Train News: रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय! लोकल प्रवासात आता ‘या’ वस्तूंना बंदी, होणार तपासणी

सर्व रेल्वे स्थानकांवर बॅग तपासणी अधिक कडक करण्यात येणार आहे. 

Mumbai Local Train News: रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय! लोकल प्रवासात आता ‘या’ वस्तूंना बंदी, होणार तपासणी

मालाड आणि बोरिवली परिसरात घडलेल्या हत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे पोलिसांनी लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुंबई लोकलमधून प्रवास करताना धारदार हत्यारे किंवा धोकादायक औजारे सोबत नेण्यावर निर्बंध घालण्यात येणार असून, सर्व रेल्वे स्थानकांवर बॅग तपासणी अधिक कडक करण्यात येणार आहे. 

रेल्वे पोलिसांनी मासळी विक्रेते, बिगारी कामगार तसेच कामानिमित्त धारदार औजारे वापरणाऱ्या इतर व्यावसायिकांना अशी औजारे शक्यतो कामाच्या ठिकाणीच ठेवावीत, असे आवाहन केले आहे. लोकलमधून प्रवास करताना चाकू, कोयता, धारदार कात्री किंवा इतर धोकादायक साधने सोबत न बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली शस्त्रक्रियेची उपकरणे बाळगण्याबाबत काही प्रमाणात सवलत देण्याचा प्रस्तावही रेल्वे पोलिसांकडून विचाराधीन असल्याची माहिती मिळाली आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर एकाच वेळी सुमारे दहा पोलीस कर्मचारी तैनात असतील. त्यापैकी दोन कर्मचारी विशेषतः प्रवाशांच्या बॅगची तपासणी करतील. तर टर्मिनस स्थानकांवर सामान तपासण्यासाठी अत्याधुनिक स्कॅनिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे. संशयास्पद वस्तू किंवा धारदार हत्यारे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

रेल्वे पोलिसांच्या मते, मुंबई लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असून, अलीकडील घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रवाशांनी तपासणीदरम्यान सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number