मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी आजचा रविवार थोडासा वेगळा आणि संयमाची परीक्षा घेणारा ठरणार आहे. कारण आज, 09 नोव्हेंबर 2025 रोजी, रेल्वे दुरुस्ती आणि मेंटेनन्सच्या कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर मोठा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द राहणार असून काही गाड्या विलंबाने धावतील. प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा आणि अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठीही परिस्थिती वेगळी नाही. कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सर्व लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटणाऱ्या पनवेल, बेलापूर आणि वाशी दिशेच्या गाड्या तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 या वेळेत CSMT कडे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांना CSMT–कुर्ला आणि पनवेल–वाशी या विभागांदरम्यान काही विशेष लोकल रेल्वे गाड्या चालवल्या जातील. याशिवाय, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे–वाशी/नेरूळ ट्रान्स-हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा दिली आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी माटुंगा ते मुलुंड या दरम्यान मोठा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. डाउन जलद मार्गावर सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत ब्लॉक लागू राहील. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या सर्व जलद गाड्या माटुंगा स्थानकावरून धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या गाड्या त्यांच्या गंतव्य स्थानकांवर सुमारे 15 मिनिटांच्या विलंबाने पोहोचतील. तर अप जलद मार्गावर सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ठाण्यातून सुटणाऱ्या अप गाड्या मुलुंड स्थानकावरून धीम्या मार्गावर वळवल्या जातील, त्या माटुंगा पर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील आणि नंतर पुन्हा जलद मार्गावरून पुढे जातील.
दरम्यान, पश्चिम रेल्वेवरही कामकाजामुळे वाहतूक प्रभावित राहणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक ठेवण्यात आला आहे. या काळात अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील. यातील काही गाड्या विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांवर थांबा घेणार नाहीत. तसेच अंधेरी आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या काही गाड्या गोरेगाव येथेच थांबवल्या जातील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ही कामे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे मार्गांच्या भविष्यातील सुधारणा लक्षात घेऊन केली जात आहेत, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. प्रवाशांनी शक्य तितकं सहकार्य करावं, प्रवास आवश्यक असल्यास वेळेआधी निघावं आणि पर्यायी मार्गांचा विचार करावा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.