मुंबई: सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे जर तुम्ही कुटुंबासोबत सहलीचा किंवा मुंबईतच कुठेतरी भटकंतीचा बेत आखत असाल, तर घराबाहेर पाऊल टाकण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. ऐन सुट्टीच्या आनंदावर विरजण घालणारी ही अपडेट असून, उद्या मुंबईच्या 'लाईफलाईन'ला अर्थात मध्य आणि हार्बर रेल्वेला 'मेगाब्लॉक'चा ब्रेक लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक जाहीर केला असून, प्रवाशांना वेळेचे अचूक नियोजन करूनच प्रवासाला निघावे लागणार आहे.
मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी या ब्लॉकचे स्वरूप थोडे गुंतागुंतीचे असणार आहे. उद्या सकाळी 10 वाजून 4 मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून 9 मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (CSMT) सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्यांना मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या गाड्या ठाणे स्थानकानंतर पुन्हा त्यांच्या नेहमीच्या धीम्या मार्गावर येतील, मात्र या तांत्रिक बदलामुळे त्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा किमान 10 मिनिटे उशिराने धावतील.
सर्वाधिक फटका हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. पनवेलवरून CSMT कडे जाणारी अप हार्बर सेवा सकाळी 10 वाजून 33 मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून 49 मिनिटांपर्यंत पूर्णपणे बंद राहील. तर, CSMT वरून बेलापूर/पनवेलच्या दिशेने जाणारी डाऊन हार्बर लाईन सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून 12 मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ट्रान्स-हार्बरच्या प्रवाशांसाठीही पनवेल ते ठाणे (सकाळी 11 वाजून 2 मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून 53 मिनिटांपर्यंत) आणि ठाणे ते पनवेल (सकाळी 10 वाजून 1 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत) या सेवा खंडीत राहणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते.
याचप्रमाणे, कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनाही या ब्लॉकची झळ बसेल. सकाळी 10 वाजून 36 मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून 24 मिनिटांपर्यंत कल्याणवरून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या ठाणे ते मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर धावतील आणि मुलुंडनंतर पुन्हा धीम्या मार्गावर वळवल्या जातील. एकंदरीतच सांगायचे तर, उद्या सकाळी 11 ते सायंकाळी पाच या महत्त्वाच्या वेळेत CSMT वरून ये-जा करणाऱ्या सर्वच धीम्या लोकल गाड्या साधारण 10 मिनिटांच्या विलंबाने धावतील, याची प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी नोंद घेणे आवश्यक आहे.
असे असले तरी, प्रवाशांची पूर्णपणे कोंडी होऊ नये म्हणून रेल्वेने काही पर्यायी व्यवस्थाही केली आहे. या मेगाब्लॉकच्या काळात CSMT ते वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या सुरू असतील. तसेच, ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यानही ट्रान्स-हार्बर सेवा आणि पोर्ट लाईनवरील वाहतूक सुरळीत सुरू राहील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी हा ब्लॉक अपरिहार्य असल्याचे सांगत प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे, ऐनवेळची मनस्ताप आणि धावपळ टाळण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपले वेळापत्रक आधीच तपासून घेणे शहाणपणाचे ठरेल.