Mega Block: मुंबईकरांनो सावधान! शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलणार

मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल व अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Mega Block: मुंबईकरांनो सावधान! शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलणार

मुंबई: मुंबई आणि उपनगरातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला असून, त्याचा परिणाम मुख्य मार्ग, ट्रान्स हार्बर मार्ग आणि काही मेल-एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही लोकल सेवा धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण या अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या अनेक जलद आणि अर्ध-जलद लोकल गाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच कल्याणहून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या अप जलद लोकल सेवाही काही काळ धीम्या मार्गावरून चालवल्या जातील.

हेही वाचा: Indian Railways Name Story: राजधानी, शताब्दी, दुरंतो की संपर्क क्रांती? भारतीय रेल्वेच्या प्रसिद्ध गाड्यांच्या नावांमागची रंजक कहाणी

याचबरोबर मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून सुटणाऱ्या काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गातही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांनीही रेल्वेच्या अद्ययावत वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवास करावा.

दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही रविवारी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ठाणे ते वाशी, नेरुळ आणि पनवेल या मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत ठाणे-वाशी-नेरुळ-पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल सेवा पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

पश्चिम रेल्वेवरही शनिवारी मध्यरात्री 12.25 ते पहाटे 4.25 या वेळेत मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात चर्चगेट ते सांताक्रूझदरम्यान धावणाऱ्या जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरावा.

हेही वाचा: Ashadi Ekadashi 2026 : मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; धाराशिवचे शेतकरी दाम्पत्य बनले 'मानाचा वारकरी'

याशिवाय मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात नव्या पादचारी पुलाचे गर्डर बसविण्यासाठी शनिवारी मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात येणार असून, अप आणि डाऊन धीम्या तसेच जलद मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम होणार आहे.

या विशेष ब्लॉकमुळे शनिवारी रात्री सीएसएमटी-ठाणे ही एक लोकल सेवा आणि रविवारी पहाटे ठाणे-सीएसएमटी ही एक लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number