Mumbai Local Train: मुंबई लोकलचा चेहरा-मोहरा बदलणार, आता धावणार 18 डब्यांची ट्रेन, लवकरच होणार चाचणी

विरार - डहाणू मार्गावर होणाऱ्या या चाचणीत सुरक्षितता आणि तांत्रिक क्षमतेची तपासणी केली जाणार असून, यशस्वी ठरल्यास गर्दीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा चेहरा-मोहरा बदलणार, आता धावणार 18 डब्यांची ट्रेन, लवकरच होणार चाचणी

मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकल ट्रेनबाबत एक अत्यंत क्रांतिकारी बातमी समोर आली आहे. दररोज होणारी प्रवाशांची तुडुंब गर्दी आणि दरवाजाला लटकून करावा लागणारा जीवघेणा प्रवास आता इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने थेट 18 डब्यांची लोकल चालवण्याच्या दृष्टीने कंबर कसली असून, जानेवारी महिन्यात या संदर्भातील सर्वात महत्त्वाची चाचणी पार पडणार आहे. मुंबईकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे हे पाऊल आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वेने 14 आणि 15 जानेवारी 2026 हे दोन दिवस निश्चित केले आहेत. विरार ते डहाणू रोड या सेक्शनमध्ये 18 डब्यांच्या लोकलची 'अग्निपरीक्षा' घेतली जाणार आहे. सध्या मुंबईत 9, 12 आणि 15 डब्यांच्या लोकल धावतात, मात्र 18 डब्यांच्या लोकलमुळे ट्रेनची प्रवासी क्षमता एका फटक्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास भविष्यात विरार, बोरीवली आणि अंधेरीसारख्या अतिगर्दीच्या स्थानकांवरील ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा: Fake Certificates: 1300 लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील 'या' गावात 27,000 जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी; चौकशीसाठी SIT कडून तपास सुरू

या चाचणीमध्ये दोन मुख्य तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल. पहिली म्हणजे 'इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टन्स', म्हणजेच आणीबाणीच्या वेळी ब्रेक लावल्यानंतर 18 डब्यांची ही लांबच लांब ट्रेन नेमकी किती अंतरावर थांबते, याचे मोजमाप केले जाईल. दुसरी चाचणी 'कपलर फोर्स' संदर्भात असेल, जी ब्रेक लावताना डब्यांना एकमेकांशी जोडून ठेवणाऱ्या यंत्रणेवर किती ताण येतो, याचे मूल्यांकन करेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने या दोन्ही चाचण्या अत्यंत निर्णायक मानल्या जात आहेत.

विशेष म्हणजे, रेल्वेने या चाचणीसाठी दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे 'रॅक' निवडले आहेत. यामध्ये 'बॉम्बार्डियर-क्लास' रॅकची चाचणी 110 किमी प्रतितास वेगाने, तर 'मेधा इलेक्ट्रिकल्स' रॅकची चाचणी 105 किमी प्रतितास वेगाने करण्याची तयारी आहे. विरार-डहाणू मार्ग हा कमी व्यत्ययाचा आणि हाय-स्पीड धावण्यासाठी योग्य असल्याने याच मार्गाची निवड करण्यात आली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर स्वतः बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे इतिहासात हा बदल महत्वाचा ठरू शकतो. सध्याच्या फलाटांची लांबी वाढवणे आणि तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये बदल करणे हे रेल्वेपुढील मोठे आव्हान असले, तरी 18 डब्यांची लोकल हा गर्दीवरचा सर्वात प्रभावी उपाय मानली जात आहे. जर या चाचण्या यशस्वी झाल्या, तर येत्या काळात मुंबईकरांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि मोकळा प्रवास अनुभवायला मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Oppo A6 Pro: पाण्यात पडला तरी बिघडणार नाही; बॅटरी चार्जिंग सुद्धा काही मिनिटात, Oppo चा हा नवीन फोन विक्रीसाठी उपलब्ध

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number