जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई
वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण… मात्र मुंबईकरांच्या या लाडक्या वडापावमध्ये चक्क मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. या प्रकारानंतर वडापाव विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
मुंबईतील अंबरनाथ पूर्व भागातल्या स्टेशन परिसरात ‘बबन वडापाव’ हा नामांकित वडापाव विक्रेता असून त्याच्याच दुकानात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरातील एका कार्यालयात काम करणाऱ्या अल्पा गोहिल या तरुणीने आज सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी म्हणून इथून वडापाव नेले होते.मात्र वडापाव खाताना त्यामध्ये चक्क मेलेलं पालीचं पिल्लू आढळून आलं. त्यामुळे गोहिल यांनी पुन्हा दुकानात धाव घेतली. मात्र चूक मान्य करण्याऐवजी दुकानातील कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरं देत तिला अक्षरशः तेथून हाकलून दिलं. या प्रकारामुळे ग्राहक संतप्त झाले.
यानंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली, तेव्हा या बबन वडापाव दुकानाचं फूड लायसन्सदेखील संपलेलं असल्याचं समोर आलं.
धक्कादायक बाब म्हणजे दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी हा पाल असलेला वडा फेकून दिला आणि असून त्यात पाल असल्याची कबुलीही दिली आहे.
या सर्व प्रकरानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत दुकान बंद केलं.
आता या दुकानावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.