Mumbai Indians: नीता अंबानींची रणनीती यशस्वी! मुंबईला दोन ट्रॉफी जिंकवणारा खेळाडू अवघ्या 1 कोटीत ताफ्यात, कोण आहे हा स्टार क्रिकेटर?

क्विंटन डिकॉकला केवळ 1 कोटींमध्ये ताफ्यात घेत मुंबईने संघाची ताकद वाढवली.

Mumbai Indians: नीता अंबानींची रणनीती यशस्वी! मुंबईला दोन ट्रॉफी जिंकवणारा खेळाडू अवघ्या 1 कोटीत ताफ्यात, कोण आहे हा स्टार क्रिकेटर?

Mumbai Indians:आयपीएल 2026 च्या लिलावात मोठमोठ्या बोलींची चर्चा सुरू असताना मुंबई इंडियन्सने मात्र शांतपणे पण अचूक चाल खेळली आहे. कमी पर्स असूनही नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने अनुभव आणि भरोशावर आधारित निर्णय घेतला आणि संघाला सलग दोन वेळा विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या खेळाडूला अवघ्या 1 कोटी रुपयांत पुन्हा ताफ्यात सामील केलं आहे.

आयपीएलच्या 19व्या हंगामासाठी मिनी लिलावाची प्रक्रिया सुरू झाली असून, यंदा एकूण 369 खेळाडूंवर बोली लागणार आहे. लिलावाच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पृथ्वी शॉ, दीपक हुड्डा यांसारखे काही मोठे भारतीय चेहरे अनसोल्ड राहिले, तर काही संघांनी धोरणात्मक पद्धतीने आपले डाव आखले. कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक 64.30 कोटींची पर्स असताना, मुंबई इंडियन्सकडे केवळ 2.75 कोटी इतकी मर्यादित रक्कम होती. त्यामुळे मुंबईला प्रत्येक खरेदी अत्यंत विचारपूर्वक करणे गरजेचे होते.

याच पार्श्वभूमीवर मुंबईने पहिल्याच खरेदीत आपल्या जुन्या आणि विश्वासू खेळाडूवर डोळा ठेवला. दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक याला मुंबई इंडियन्सने त्याच्या बेस प्राईज म्हणजेच 1 कोटी रुपयांत विकत घेतले. हा निर्णय अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्यकारक ठरला, पण मुंबईच्या दृष्टीने हा सौदा फायदेशीर मानला जात आहे.

क्विंटन डी कॉकचा आयपीएलमधील प्रवास अनुभवाने भरलेला आहे. त्याने आतापर्यंत 115 आयपीएल सामने खेळले असून 30 पेक्षा अधिक सरासरीने आणि 134 च्या आसपास स्ट्राइक रेटने 3300 हून अधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी खेळताना त्याने 2019 आणि 2020 या सलग दोन विजेतेपदांमध्ये निर्णायक योगदान दिले होते. 2019 मध्ये त्याने 16 सामन्यांत 521 धावा करत मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता, तर 2020 मध्येही त्याने 503 धावांची दमदार कामगिरी केली होती.

अलीकडेच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेत चंदीगड येथे झालेल्या सामन्यात डी कॉकने 46 चेंडूंमध्ये 90 धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे त्याचा फॉर्म पुन्हा उंचावल्याचं स्पष्ट दिसत आहे. 2025 नंतर केकेआरने त्याला रिलीज केलं होतं, पण मुंबईने संधी साधत पुन्हा त्याला आपल्या कुटुंबात परत आणलं आहे.

मर्यादित बजेटमध्ये अनुभवी आणि सिद्ध खेळाडू मिळवणं हे मुंबई इंडियन्सचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलं आहे. यंदाही नीता अंबानींच्या या रणनीतीमुळे मुंबईची फलंदाजी अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच लिलावात कॅमेरून ग्रीनवर केकेआरने 25.20 कोटींची विक्रमी बोली लावत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, मोठ्या बोलीपेक्षा योग्य सौदा कसा करायचा, हे मुंबईने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number