Mumbai: मुंबईकरांनो सावधान! उद्यापासून उघड्यावर कचरा टाकला तर थेट 500 रुपयांचा दंड

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर सोमवारपासून कठोर कारवाई होणार आहे. 200 ते 500 रुपयांपर्यंत दंडासह सीसीटीव्हीद्वारे देखरेख करण्यात येणार आहे

Mumbai: मुंबईकरांनो सावधान! उद्यापासून उघड्यावर कचरा टाकला तर थेट 500 रुपयांचा दंड

मुंबई शहर अधिक स्वच्छ आणि कचरामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या, थुंकणाऱ्या किंवा अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 200 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असून, सर्व 24 प्रशासकीय वॉर्डमध्ये ही मोहीम एकाच वेळी राबवली जाणार आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये उघड्यावर कचरा टाकण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे स्वच्छतेवर परिणाम होत असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर न्यायालयानेही या विषयावर गंभीर भूमिका घेतल्याने महापालिकेने अंमलबजावणी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोहिमेअंतर्गत कचरा वारंवार साचणाऱ्या आणि अस्वच्छता निर्माण होणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, समुद्रकिनारे, नाले, जलस्रोत परिसर तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेने केवळ कचरा फेकणाऱ्यांवरच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, रस्त्यावर घाण करणे, उद्यानांमध्ये अस्वच्छता करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांना खाऊ घालून घाण निर्माण करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. स्वच्छता नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

याशिवाय, शहरातील कचरा संवेदनशील ठिकाणांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून ती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भागांमध्ये नियमित स्वच्छता, कचऱ्याचा स्रोत शोधणे, संकलन व्यवस्था सुधारणे, वाहतूक आणि मनुष्यबळातील त्रुटी दूर करण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मुंबईला अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील अस्वच्छतेवर काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number