मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरी रेल्वे दररोज लाखो प्रवाशांचा प्रवास सुलभ करते. मात्र, रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार करणाऱ्या मुंबईकरांनी थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मध्य रेल्वेने विविध देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मुंबई विभागात मेगाब्लॉक जाहीर केला असून, याचा परिणाम मुख्य मार्गावरील जलद लोकल तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुख्य मार्गावरील जलद लोकलवर परिणाम
मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या गाड्या जलद मार्गावरून चालविण्यात येतील. अतिरिक्त वाहतुकीचा ताण वाढल्यामुळे जलद लोकल काही प्रमाणात विलंबाने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करावे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक सेवा रद्द
ट्रान्स हार्बर मार्गावरही ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. या कालावधीत दोन्ही दिशेतील अनेक लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागू शकतो.
'या' वेळेतील लोकल सेवा बंद
मेगाब्लॉकमुळे ठाणे स्थानकावरून वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ दरम्यानच्या सर्व डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. त्याचप्रमाणे पनवेल, नेरूळ आणि वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ या वेळेतील सर्व अप लोकल सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन
देखभाल कामे सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ब्लॉकदरम्यान काही सेवा सुरू असल्या तरी वेळापत्रकात बदल आणि विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवावे, शक्य असल्यास पर्यायी वाहतुकीचा वापर करावा आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा.