Mumbai Pollution: मुंबईत गेल्या काही दिवसांत वायू प्रदूषणाची स्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 300 ते 400 च्या पलीकडे पोहोचल्याने नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला आहे. दिल्लीसारख्या परिस्थितीकडे मुंबई वेगाने जात असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) उच्च सतर्कतेवर आली आहे. वाढत्या धूर, धूळकण आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने शहरात GRAP-4 लागू करत 28 कठोर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
मुंबईत देवनार, मालाड, चेंबूर, अंधेरी पूर्व, पवई, बोरिवली, नेव्ही नगर आणि मुलुंडसारख्या भागात AQI अत्यंत खराब श्रेणीत नोंदवला गेला. हवेत धूळकणांचे प्रमाण वाढल्यामुळे घशात खवखव, डोळ्यांत जळजळ, श्वसनाचे त्रास, दमा वाढणे याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. वाढत्या प्रदूषणासाठी मोठ्या प्रमाणावर चालणारे बांधकाम, वाहतूक आणि औद्योगिक उत्सर्जन जबाबदार असल्याचे बीएमसीचे निरीक्षण आहे.
यामुळे बीएमसीने सर्व प्रकल्पांवर कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. AQI गंभीर पातळीवर असलेल्या भागांमध्ये अनेक बांधकामे थांबवण्यात आली असून, 50 पेक्षा जास्त साइट्सना नोटिसाही बजावल्या गेल्या आहेत. धूळकण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर, स्मॉग गन, उंच बॅरिकेडिंग, सतत पाण्याची फवारणी, तसेच वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर थेट कामबंदी आणि दंडाची कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
बांधकाम प्रकल्पांशिवाय वाहतूक क्षेत्रालाही कडक नियम लागू झाले आहेत. 8 वर्षांपेक्षा जुनी डिझेल अवजड वाहने शहरात प्रवेश करू शकणार नाहीत, वाहने ओव्हरलोड झाल्यास किंवा साहित्य न झाकता वाहतूक केल्यास थेट जप्तीची कारवाई होईल. औद्योगिक भागांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण दररोज तपासण्याची जबाबदारी MPCB कडे सोपवण्यात आली आहे.
नागरिकांनाही घरी एअर प्युरिफायर वापरणे, बाहेर पडताना मास्क लावणे, सकाळच्या स्मॉगमध्ये चालणे-धावणे टाळणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रदूषण आटोक्यात येईपर्यंत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन बीएमसीने केले आहे.
बीएमसीचे 28 कठोर नियम
बांधकाम प्रकल्पाभोवती 25–35 फूट उंच बॅरिकेडिंग अनिवार्य
संपूर्ण इमारत हिरवे कापड/ताडपत्रीने झाकणे आवश्यक
पाडकामावेळी जागा संपूर्ण झाकणे
पाडकामादरम्यान सतत पाण्याची फवारणी
धूळ निर्माण करणाऱ्या साहित्यावर नियमित फवारा
साहित्य वाहतूक करणारी सर्व वाहने पूर्ण झाकलेली
वाहनांमध्ये वजनमर्यादा पाळणे
प्रत्येक साइटवर सीसीटीव्ही अनिवार्य
AQI मॉनिटर करणारे सेन्सर बसवणे
कटिंग/ग्राइंडिंग बंदिस्त जागेतच
अशा कामांदरम्यान सतत फवारा
राडारोडा फक्त बीएमसीच्या ठिकाणीच टाकणे
वाहने उतरवल्यानंतर स्वच्छ धुणे
वैध PUC असलेलीच वाहने वापरणे
कामगारांनी मास्क, हेल्मेट, गॉगल वापरणे अनिवार्य
बीएमसी प्रकल्पांवर 25 फूट बॅरिकेडिंग
मेट्रो कामांवर ताडपत्री + स्प्रिंकलर अनिवार्य
सर्व सरकारी–खासगी प्रकल्पांनी नियम पाळणे आवश्यक
रात्री अवैध राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई
प्रत्येक विभागात तपासणी पथके नियुक्त करणे
लहान विभागात 2, मध्यममध्ये 4, मोठ्यात 6 पथके
पथकांकडून साइटची व्हिडिओग्राफी
नियम न पाळणाऱ्यांवर तात्काळ कामबंदी/सीलिंग
स्मॉग गन व स्प्रिंकलर अनिवार्य
नियम मोडणारी वाहने जप्त
8 वर्षांहून जुनी डिझेल अवजड वाहने बंद
MPCB कडून औद्योगिक उत्सर्जनाचे दैनंदिन निरीक्षण
कामगारांसाठी साइटवरच भोजनाची व्यवस्था, लाकूड जाळणे बंद