मुंबई: होळी सरली आणि मुंबईच्या आकाशातून जणू अग्नीवर्षाव सुरू झाला आहे. वाढत्या उन्हामुळे मुंबईची 'जीवनवाहिनी' असलेल्या लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कासावीस होत असताना, आता मुंबईकरांनी थंडाव्यासाठी वातानुकूलित (एसी) लोकलचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. घामाच्या धारांनी भिजण्यापेक्षा एसी लोकलच्या सुखद प्रवासासाठी फलाटावर ताटकळणे प्रवाशांनी पसंत केले आहे. मात्र, या थंडगार प्रवासाच्या ओढीपोटी नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 'फुकट्या' प्रवाशांची संख्याही चिंताजनकरीत्या वाढली असून, रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांकडून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे.
मुंबईत सध्या उन्हाचा चटका असह्य झाला असून दुपारच्या वेळी साध्या लोकलचा प्रवास जणू 'भट्टी'त बसल्यासारखा वाटू लागला आहे. त्यामुळे एसी लोकल विलंबाने धावत असली तरी, प्रवासी इतर गाड्या सोडून एसी लोकलचीच वाट पाहत उभे असल्याचे चित्र स्थानकांवर दिसत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह आता हार्बर मार्गावरही एसी लोकलचा गारवा पोहचला असून, 94 फेऱ्यांपैकी 14 फेऱ्या नुकत्याच हार्बरवर सुरू करण्यात आल्या आहेत.
विनातिकीट प्रवाशांची 23 टक्क्यांनी वाढ
एसी लोकलची वाढती ओढ ही केवळ अधिकृत प्रवाशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत तब्बल 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अकरा महिन्यांत सुमारे एक लाख 10 हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली, जे गेल्या वर्षीच्या 89,799 या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत. विशेष म्हणजे, दररोज सरासरी 401 प्रवाशांना दंडाचा दणका दिला जात आहे.
रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींचा दंड जमा
विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत 3.51 कोटी रुपयांचा दंड वसूल केला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाच्या रकमेत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. दररोज सरासरी 1.27 लाख रुपये केवळ दंड म्हणून वसूल केले जात आहेत. नियमांचे उल्लंघन करून एसीचा आनंद घेणाऱ्यांसाठी हा दंडाचा आकडा डोळे उघडणारा आहे.
पश्चिम रेल्वेही 'फुकट्यां'च्या बाबतीत आघाडीवर
केवळ मध्य रेल्वेच नाही, तर पश्चिम रेल्वेवरही विनातिकीट प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या काळात पश्चिम रेल्वेवर एक लाख 16 हजारांहून अधिक प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 3.76 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवासाची शिस्त मोडीत काढून एसी डब्यात शिरणाऱ्या या प्रवाशांवर रेल्वेची भरारी पथके करडी नजर ठेवून आहेत.
वाढती मागणी आणि नियोजनाचे आव्हान
सध्या मध्य रेल्वेवर एकूण 94 एसी फेऱ्या धावत आहेत. उन्हाळा जसा तीव्र होईल, तशी या फेऱ्यांची मागणी अधिक वाढणार आहे. मात्र, गाड्यांचा विलंब आणि वाढती गर्दी यामुळे रेल्वे प्रशासनासमोर सेवा देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे तिकीट दर आणि दुसरीकडे फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई, असा दुहेरी संघर्ष सध्या मुंबईच्या रुळांवर पाहायला मिळत आहे.