मुंबई: राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. चालू आर्थिक वर्षात महामंडळाला तब्बल 591 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील 31 विभागांपैकी केवळ 8 विभाग नफ्यात असून उर्वरित विभाग तोट्यात चालत आहेत.
नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे यांसारखे महत्त्वाचे विभागही तोट्यात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या या विभागांमध्येही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधला जात नसल्याचे चित्र आहे.
एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या तोट्यासाठी व्यवस्थापन जबाबदार असल्याचे मत जय महाराष्ट्र न्यूजसोबत बोलताना व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भाडेवाढ करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही महामंडळाला अपेक्षित नफा मिळू शकला नाही.
अधिकाऱ्यांचे वाढते वेतन, आस्थापनावरील खर्च आणि आर्थिक शिस्तीचा अभाव यामुळे तोटा वाढल्याचा आरोप केला जात आहे.
तिकीट दर वाढवणे हा एक पर्याय असू शकतो, पण त्यामुळे प्रवाशांचा रोष ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ भाडेवाढ करून प्रश्न सुटणार नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन, डिझेल खर्च, रिकाम्या धावणाऱ्या बस आणि व्यवस्थापनातील त्रुटी यावर काम करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
एकूणच, लाल परीची आर्थिक घडी बसवण्यासाठी राज्य सरकार, परिवहन विभाग आणि महामंडळ प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अन्यथा हा तोटा पुढील काळात आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.