महाराष्ट्राची लाल परीला उभारी देण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) मेगा भरती होणार आहे. एसटी महामंडळात तब्बल 17 हजार 742 कर्मचाऱ्यांची महाभरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महामंडळात चालक आणि वाहकांची मोठी कमतरता असल्याने हा भरतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, महामंडळ दरवर्षी 5 हजार नवीन बस खरेदी करणार आहे. त्यापैकी 3 हजार वाहनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, टाटा मोटर्सला 2100 बस पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाड्यांची संख्या वाढत असल्याने कर्मचारीही तेवढ्याच प्रमाणात आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.
विधीमंडळात आमदार श्रीकांत शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, "सदर भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, तिथून हिरवा कंदील मिळताच भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाईल.
विशेष म्हणजे, या भरतीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.