खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे बुधवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७२ व्यावर्षी अखेरचा श्वास घेतला.
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यांचे निधन झाले असल्याची माहिती देण्यात आली.
गिरीश बापट हे आपल्या दांडग्या जनसंपर्कासाठी ओळखले जात. आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा अजूनही दबदबा होता. गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते पुण्याकडे रवाना झाले आहेत.
कोण होते गिरीश बापट ?
आणीबाणीच्या काळात बापट यांना १९ महिन्यांचा कारावास झाला होता. ते नाशिक जेलमध्ये होते. १९७३ मध्ये टेल्को कंपनीत काम करताना त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलनं केली होती. टेल्को कंपनीत १९७३ ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता.
पुणे महानगरपालिकेत १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात बापट नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. तसेच १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.
पुण्याच्या राजकारणात गिरीश बापट हे ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत आहे. दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते.