Palghar: पालघर जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या वाहन देखभालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे ते जव्हार मार्गावर धावणाऱ्या जव्हार आगाराच्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळल्याने मोठा अपघात टळला. विशेष म्हणजे, चाक निखळल्यानंतरही बस काही अंतर धावत राहिल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ही घटना वाडा-भिवंडी महामार्गावरील नेहरोली परिसरात घडली. नेहमीप्रमाणे बस ठाण्याहून जव्हारकडे प्रवाशांना घेऊन जात होती. प्रवास सुरळीत सुरू असतानाच अचानक बसमधून जोराचा आवाज आला. सुरुवातीला चालक आणि प्रवाशांना नेमके काय घडले याची कल्पना आली नाही. मात्र काही क्षणांतच बस असामान्य पद्धतीने हलत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचे मागील चाक अचानक निखळून रस्त्यावर पडले होते. धक्कादायक बाब म्हणजे, चाक निखळल्यानंतरही बस सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत एका चाकावर धावत राहिली. या दरम्यान बसचा दुसरा मागील टायरही फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण ठेवले आणि बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांसह सुमारे 50 जण प्रवास करत होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणी होत असेल तर अशा घटना कशा घडतात, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. एसटी महामंडळाच्या वाहनांच्या दुरुस्ती आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही काही प्रवाशांनी केला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वेळेत बस थांबवली नसती तर मोठा अपघात होऊ शकला असता. या प्रकरणी एसटी प्रशासनाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत असून, संबंधित बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.