उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दुसऱ्या जातीतील तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधांना विरोध करत आईनेच आपल्या 20 वर्षीय मुलीचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर-1 परिसरातील भय्यासाहेब आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या 20 वर्षीय अमृता गरड हिचे दुसऱ्या जातीतील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला कुटुंबाचा, विशेषतः आईचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
रविवारी मध्यरात्रीनंतर घरात पुन्हा एकदा आई-मुलीमध्ये याच विषयावरून जोरदार वाद झाला. त्यावेळी घरातील इतर सदस्य झोपेत असल्याचे सांगितले जात आहे. वाद वाढल्यानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी रागाच्या भरात आईने दुपट्ट्याच्या सहाय्याने तिचा गळा आवळल्याचा आरोप पोलिसांनी नोंदवला आहे. या घटनेत अमृताचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि प्राथमिक तपासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी अमृताची आई आशा गरड हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू आहे. घरातील इतर सदस्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत.