वर्धा: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कारडा गावात अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला सोबत घेत तलावात उडी घेतल्याची घटना समोर आली असून या दुर्घटनेत आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मृत महिलेचे नाव शीतल जगदीश कुंभेकर (वय 30) असे असून तिच्या तीन वर्षांच्या मुलाचे नाव हिमांशू असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सदस्यांसाठी नाश्ता बनवत होती. त्यानंतर ती मुलाला सोबत घेऊन घराबाहेर पडली. काही वेळानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी गावात आणि परिसरात तिचा शोध सुरू केला.
दरम्यान, दुपारच्या सुमारास घराजवळील तलावात दोन मृतदेह तरंगताना दिसून आले. गावकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ते मृतदेह शीतल आणि तिच्या मुलाचे असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. पुढील तपासासाठी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्राथमिक तपासात घरगुती कारणांमुळे शीतलने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमके कारण काय होते, याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेमुळे कारडा गावात हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. एका निष्पाप चिमुकल्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने अनेकांनी संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.