बुधवार, 8 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड मोठा ढिगारा घसरुन प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवडच्या मोशी या ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा पडल्याने इमारत कोसळल्याच्या घटनेमध्ये 23 जण अडकल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. यामध्ये चार दिवसापासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अखेर आठ जणांना या ढिगाऱ्या खालून काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले असले तरी मात्र दुर्दैवाने या आठही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. तसेच 14 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये अजूनही एक व्यक्ती अडकला असून त्याचा शोध सध्या सुरू आहे.त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले सर्च ऑपरेशन शेवटच्या टप्यात आले आहे.
यावेळी अक्षय सावंत (वय 35, मोशी), सुनील कोरके (वय 40, आळंदी), सन्नी माने (वय 39, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय 33, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय 26, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय 22, मोशी), भावेश वाणी ( वय 33 निगडी) यांना मृत घोषित केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मोशी येथील दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रशासन बचावाचे काम आज रात्री पूर्ण करेल, अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली.